Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेत कर्जत जामखेड मतदार संघात प्रा. राम शिंदे यांचे राजकीय प्राबल्य कायम राहिले. दोन वेळेस ते आमदार राहिले आहेत. २०१९ ला मात्र आ. रोहित पवार हे आमदार झाले व त्यांचा पराभव झाला.
दरम्यान आता त्यांनी नुकतीच एक २०२२ मधील आठवण सांगितली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवादरम्यान मला घरातच स्थानबद्ध केले गेले होते असे ते म्हणाले.
नेमके काय म्हणाले आ. शिंदे?
येत्या 31 मेपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव सुरु होईल. जामखेड तालुक्यातील चौंडी हे गाव त्यांचे जन्मस्थळ असून तेथे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
तसेच 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव मात्र अजिबात नव्हते व मला बोलावलेही नव्हते. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते परंतु आम्ही मात्र आता यावेळी आमदार रोहित पवार यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव देखील टाकले असून त्यांना बोलावलेही आहे असे ते म्हणाले.
अहिल्यादेवींचे माहेर असलेल्या शिंदे परिवाराचा मी एक घटक असून दोनदा गावाचा सरपंच, आमदार देखील दोन वेळा झालो व पालकमंत्री म्हणून देखील मी राजकीय भूमिका वठवलेली आहे. परंतु असे असतानाही 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव देखील टाकले नाही. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते. 31 मे 2022 चा जयंती महोत्सव मी घरात साजरा केलेला होता असे ते म्हणाले.
विविध कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आता 299 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी येथे विविध कार्य्रक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अनेक मान्यवर असतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.मी मंत्री झाल्यावर चौंडीतील विकास कामांचा निधी नियमितपणे सुरू झाला व त्यानंतर चौंडीच्या विकासाला गती मिळाली असे देखील ते यावेळी म्हणाले.