अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण विविध पद्धतीने आपले रंग दाखवत आहे. सध्या जिल्ह्यात विखे एकीकडे व विखे विरोधक एकीकडे असे चित्र झालेले आहे. असे असले तरी आ. प्राजक्त तनपुरे कधी विखेंच्या विरोधात गेले नाही किंवा बोलले नाहीत.
त्यांची एकमेकांना साथ आहे अशीच चर्चा नगरमध्ये रंगलेली असते. परंतु आता नागपूर अधिवेशनात आ. प्राजक्त तनपुरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी विविध मुद्दे मांडत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे वाभाडेच काढले.
मंत्री विखेंवर घणाघात
राहुरी ग्रामीण रुग्णालयातील प्रश्नांवर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे हे आक्रमक झाले होते. ‘पालकमंत्री कधी कोणतीही संकल्पना राबवतील, तर आरोग्य व्यवस्थेचे काय होणार? असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, नगरपालिकेने राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाला शहरात जागा दिली, या जागेबाबत अनंत अडचणी होत्या. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेत अनेक बैठक घेत हा प्रश्न सोडवला. आता नागरिकांसाठी हे रुग्णालय बांधायचे, तर पालकमंत्री यांनी नवीनच संकल्पना राबवून ग्रामीण रुग्णालय बाहेर कुठेतरी नेण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा अडचणी वाढल्या.
हे रुग्णालय गावाबाहेर पाच किलोमीटरवर नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हे करताना त्यांनी स्थानिक आमदारांना विश्वासात घेतले नाहीच शिवाय आता काय अन् कशाप्रकारे आरोग्य व्यवस्था होणार याची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे असे ते म्हणाले.
पावसाळी अधिवेशनात आमदार तनपुरे यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा गाजवला होता. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहुरी शहरात रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होत असेल तर रुग्णालय गावाबाहेर नेण्याचा विषय संपला याबाबत अधिवेशन काळात बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे त्यांनी सांगितले होते.
पण राहुरी ग्रामीण रुग्णालयावर तोडगा निघालाच नसल्याने आमदार तनपुरे यांनी हा मुद्दा पुन्हा नागपूर हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
सत्तांतराने अनेक प्रश्न तसेच राहिले
महाविकास आघाडीच्या काळात आ. तनपुरे हे राहुरीतील बसस्थानक आणि रुग्णालयाच्या प्रश्नावर लढत आहेत. विविध स्तरावर पाठपुरावा करत आहेत. परंतु राज्यात सत्तांतर झाले,
महायुतीचे सरकार आले. यामुळे महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली गेली व यामध्ये मिळाली राहुरीतील हे मुलभूत प्रश्न आहे तसेच राहिले.