अहमदनगर बातम्या

Ahmednagar Politics : गुलाल कुणाचा? कोणत्या भागातील किती फेऱ्या? फेऱ्यानुसार मतमोजणीचे नियोजन कसे? पहा सविस्तर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : सर्वांचेच लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि.४ जून रोजी सकाळी सुरु होत असून यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ‘एमआयडीसी’ येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार आहे.

या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार ५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता गुलाल नेमका कुणाचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्रमांक १ येथे, तर शिर्डी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्रमांक ३ मध्ये होणार आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येत असून शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदे व कर्जत जामखेड, असे ६ विधानसभा मतदार संघ आहेत. तसेच, शिर्डी लोकसभा मतदार संघात अकोले,

संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे, असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवारांना ओळखपत्र देण्यात आले आहेत

मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था असून संपूर्ण मतमोजणी केंद्रावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे करडी नजर ठेवणार आहेत. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास एकदम बंदी केलेली असून स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन केला गेला आहे. त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोचविली जाणार आहे.

विधानसभा निहाय मतमोजणी फेऱ्या
अहमदनगर : लोकसभा मतदार संघातील शेवगाव पाथर्डी – ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, राहुरी- ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, पारनेर – ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, नगर शहर- २८८ मतदान केंद्र २१ फेऱ्या, श्रीगोंदे- ३४५ मतदान केंद्र २५ फेऱ्या, तर कर्जत-जामखेड-३५६ मतदान केंद्र २६ फेऱ्या होणार आहेत.

शिर्डी : लोकसभा मतदारसंघातील अकोले – ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, संगमनेर – २७८ मतदान केंद्र २० फेऱ्या, शिर्डी – २७० मतदान केंद्र २० फेऱ्या, कोपरगाव- २७२ मतदान केंद्र २० फेऱ्या, श्रीरामपूर- ३११ मतदान केंद्र २३ फेऱ्या तर नेवासे – २७० मतदान केंद्र २० फेऱ्या होणार आहेत.

Ahmednagarlive24 Office