लोकसभा आधी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचीच तयारी जोरदार सुरु आहे. जागा कमी अन इच्छुक जास्त अशी स्थिती सध्या आहे.
काही मातब्बरांनी तर पक्षाचा विचार न करता आम्हीच पक्ष असे समजून कामाला लागा असे आदेशही दिलेत. त्यामुळे आता काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळतील का? अशी चर्चा मात्र रंगली आहे.
त्यात आता शेवगाव मतदार संघाचा विचार केला तर सध्या मोनिका राजळे या भाजपच्या स्टँडिंग आमदार आहेत. परंतु तेथून आता घुले पाटील यांनी काही झाले तरी निवडणूक लढवणारच असा निश्चयच केला आहे. परंतु ते लढतील कोणत्या पक्षाकडून हे मात्र निश्चित नाही. परंतु ते भाजप किंवा अजित पवार गटात जातील अशी चर्चा मात्र आहे.
घुले पाटील यांची चाचपणी !:- सध्या शेवगाव मतदार संघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विधानसभा लढवायचीच आहे असा शड्डू ठोकला आहे. सध्या ते विविध माध्यमातून चाचपणी करत आहेत.
आता खुद्द जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांनी आमदार मोनिका राजळे यांचा बालेकिल्ला असलेल्या भागातच हळदी-कुंकू समारंभ घेऊन चाचपणी केल्याने चर्चाना ऊत आला आहे.
राजश्री घुले यांनी कोरडगाव परिसरातील महिलांशी संवाद साधला. त्या माध्यमातून घुले आता राष्ट्रवादी की भाजप, कोणाचा राजकीय मळवट भरतात, याकडे लक्ष लागले आहे. पाथर्डी तालुक्यात नव्या जोमाने घुले कुटुंब सक्रिय झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमांचा आधार :- माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आगामी विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार केला आहे.
त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू आहे. पंचायत समितीच्या गणनिहाय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, त्याची सांगता शेवगाव येथे महिलांच्या महामेळाव्याच्या रूपाने होणार आहे.
राजकीय परिस्थितीची फारशी दखल न घेता, मागील आठवड्यात घुले यांनी ‘आपलाच झेंडा व आपलाच दांडा’ हाती घेऊन कार्यकत्यांनी कामाला लागावे, असा आदेश दिला होता.
याचा अर्थ उमेदवारीबावत कुठल्याही पक्षावर घुले कुटुंब अवलंबून नसल्याचा संदेश त्यांनी दिला. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचा लाभ घेत नव्या वर्षांत हळदी-कुंकू समारंभ, महिला मेळावे, बचत गट मेळावे आदींच्या माध्यमातून भेटीगाठींवर भर दिला जात आहे.
विधानसभेला कोणाकोणाची होऊ शकेल फाईट? :- प्रताप ढाकणे, आमदार राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अपक्ष म्हणून दिलीप खेडकर, शेवगावच्या हर्षदा काकडे, वचित आघाडीचे किसन चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र, मुख्य सामना घुले, राजळे, ढाकणे यांच्यातच होणार आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत घुले कुटुंबाचा पाथर्डीत फारसा शिरकाव नव्हता. राष्ट्रवादीअंतर्गत ढाकणे-घुले यांच्यातील संबंध दुरावले.
त्यामुळे घुले यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करीत ढाकणे यांच्यापासून बाजूला झाल्याचा संदेश कार्यकत्यांना दिला. त्याचाच भाग म्हणून पाथर्डी तालुक्यात टाकळीमानुर गट वगळता त्यांनी विविध प्रकारे संपर्क मोहीम हाती घेतली आहे.