Ahmednagar Politics : पवार-शिंदे या दोन आमदारांच्या श्रेयवादात कर्जतची एमआयडीसी मृगजळ ठरणार? काय आहे सद्यस्थिती? पहा..

shinde pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न हा सध्या चर्चेत आहे. आ. रोहित पवार यांनी एमआयडीसीचा प्रश्न धसास लावला होता व केवळ एक सही बाकी होती असे ते म्हणालेत. तर दुसरीकडे आ. राम शिंदे यांनी एमआयडीसी हवी पण त्या जागेत नको असे सांगत आता एमआयडीसी साठी दुसरी जागा शोधली आहे.

परंतु आता या दोन आमदारांच्या श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील एमआयडीसी मृगजळ तर ठरणार नाही ना? असा प्रश्न कर्जत- जामखेडच्या जनतेला पडला आहे. ‘एमआयडीसी’ आम्हीच आणू, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केला. कुठेही होऊ द्या मात्र कर्जत-जामखेडमध्ये ‘एमआयडीसी’ होऊ द्या, असे युवा वर्ग व नागरिकांची इच्छा आहे.

तालुक्यात पाटेगाव परिसरात आमदार रोहित पवारांनी ‘एमआयडीसी’ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महाविकास आघाडी सरकारमधील वजनदार आमदार म्हणून त्यांच्या प्रयत्नाला गती मिळाली. मात्र, कुठे माशी शिंकली काय माहीत, मंजुरी अंतिम टप्प्यात असताना सरकार बदलले व प्रक्रिया रखडली,

असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. त्याच ठिकाणी मीच ‘एमआयडीसी’ अंतिमतः मंजूर करून आणील, असा दावा केला. दुसरीकडे पाटेगाव ग्रामपंचायत ठरावाचा हवाला देत तेथील जागा पूरकनसून कोंभळी परिसरात ‘एमआयडीसी’ मंजूर असून, तेथे सर्वेक्षण काम सुरू झाले.

याबाबत सर्व सोपस्कार पार पाडत अंतिम मंजुरी मिळून तेथे ‘एमआयडीसी’चे स्वप्न पूर्णत्वास येईल, ते करून दाखवेल, असा दावा आमदार राम शिंदे यांनी केला.

दावे – प्रतिदावे
तालुक्यातील पाटेगाव परिसरात ‘एमआयडीसी’ची सर्व सोपस्कार पार पाडत अंतिम मंजुरीवर उद्योगमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी असताना ते थांबविले. पाटेगाव ग्रामपंचायतीने बागायती आणि निवासी क्षेत्र वगळून ‘एमआयडीसी’बाबत ठराव दिला होता, असे याबाबत ग्रामस्थांतर्फे न्यायालयीन लढा देणारे नेते अॅड. कैलास शेवाळे यांचे म्हणणे आहे.

कोंभळी परिसरातील जमीन आणि परिसर ‘एमआयडीसी’साठी पोषक असून, सर्व प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत मुहूर्तमेढ रोवली जाईल. युवकांचे अनेक वर्षांचे स्वप्न यामुळे साकार होईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी स्पष्ट केले आहे.