अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर नीलेश लंके यांनी बाजी मारली. सकाळपासून आघाडीवर असलेले सुजय विखे दुपारनंतर मागे पडल्याने नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयश्री साजरी केली.
ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे, या निवडणूक राज्यभरात भाजपसह मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. त्यात लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले होते.
नगर जिल्ह्याचा राजकीय इतिहास पहाता विखे परिवाराने गेल्या ५० वर्षात आलटून-पालटून कधी नगर तर कधी तत्कालीन कोपरगाव लोकसभा मतदारसंघावर पर्यायाने नगर जिल्ह्यावर पकड निर्माण केली.
परंतु, नीलेश लंकेंच्या रुपाने एका तळागाळातून आलेल्या नेत्याने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग तर लावलाच शिवाय विखे परिवाराची पकडही सैल झाल्याचा संदेश या निकालातून जनतेने दिला.
जिल्ह्यावर विखे कुटुंबाचा कायम राजकीय दबदबा राहिला. मंत्रीपद, जि.प. सह स्थानिक स्वराज्य संस्थांत कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिले. १९९१ मध्ये अपक्ष लढून बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. २०२४ मध्ये नातू सुजय विखेंनाही पराभवाचा सामना करावा लागला
जिल्ह्याच्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून बाळासाहेब विखे हे १९७१ ते १९९१ पर्यंत सलग विजयी झाले. त्यानंतर बाळासाहेब नगर दक्षिण मतदारसंघात आले. १९९१ मध्ये अपक्ष रिंगणात उतरून जोरदार लढत दिली, पण यशवंतराव गडाख यांचा विजय झाला.
पुढे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यानंतरही १९९८ मध्ये बाळासाहेब विखेंनी याच मतदारसंघातून विजय मिळवला. सुजय यांनी २०१९ ला विजयी होत परंपरा सुरू केली. पण आता याला ब्रेक लागला.