Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ahmednagar Politics : कर्जतमध्ये हे काय झालं ? आ. राम शिंदे आणि समर्थकांचा पुन्हा भ्रमनिरासच…

Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फेरमतमोजणीतून कोणताही बदल न झाल्याने आ. राम शिंदे पॅनलच्या पराभूत उमेदवारांचा भ्रमनिरासच झाला. काही मतांचा फरक जरी लक्षात आला असला तरी त्याचा निकालावर मात्र कुठलाही फरक पडला नसल्याने समान जागांचे चित्र कायम राहिले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कर्जत बाजार समितीच्या फेरमतमोजणीत आ. शिंदे यांचा स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि आ. रोहित पवार यांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या समसमान ९-९ जागा कायम राहिल्या. फेरमतमोजणीत कोणताही बदल घडला नाही.

परिस्थिती जैसे थे राहत याउलट आक्षेप घेतलेल्या भरत पावणे आणि लीलावती जामदार यांचे एक मत कमी झाले. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत आ. शिंदे आणि आ. पवार यांच्या पॅनलला समसमान ९-९ जागा मिळाल्या होत्या.

भाजपाचे उमेदवार भरत पावणे आणि लीलावती जामदार यांनी दि. २९ एप्रिलच्या मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने आज सेवा सोसायटीच्या ९ जागांसाठी फेरमतमोजणी पार पडली. फेरमतमोजणी कक्षात फक्त नियुक्त राजकीय प्रतिनिधींनाच प्रवेश दिला.

प्रसारमाध्यमांनाही आतमध्ये प्रवेश न दिल्याने पत्रकारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सकाळी ८ वा. सुरू झालेली मतमोजणी दुपारी दीड वाजता पूर्ण झाली. यामध्ये दोन्ही पॅनलच्या ९-९ जागा कायम राहिल्या. तसेच विजयी उमेदवारांतदेखील बदल झाला नाही.

मतांची संख्या एक-एक वाढल्याने आणि कमी झाल्याने विजयी अनुक्रमांकात मात्र बदल झाला. राष्ट्रवादीचे संग्राम पाटील आणि गुलाब तनपुरे यांचे एक-एक मत वाढले. तर भाजपाचे नंदराम नवले आणि आक्षेप घेतलेले भरत पावणे यांचे एक-एक मत कमी झाले.

कर्जत बाजार समितीच्या फेरमतमोजणीसाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसल्याने बाजारचा दिवस असल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले.

सायकलवर व मोटारसायकलवर माल विकण्यासाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्य गेटवरच अडवले जात होते. बाजार समिती कार्यालयात अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत असलेल्या मतमोजणीसाठी बाजार समितीची व्यवस्था ठप्प ठेवून सोमवारी मतमोजणी ठेवून प्रशासनाने काय साध्य केले, असा प्रश्न शेतकरी विचारत होते.