अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात आज शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाने वीजेच्या कडाक्यासह जोरदार हजेरी लावली. वादळी वार्यासह जोरदार झालेल्या पावसाने नगरकरांना चांगलेच झोडपून काढले.
तुफान पाऊस झाल्याने रस्त्यावर पाण्याचे डोह साठले. तसेच अनेक सखल भागात पाणी शिरले. या पावसामुळे नगरकरांची दाणादाण उडालीच शिवाय शहरातील गौरीघुमट,आनंदी बाजार रोडला नदीचे स्वरूप आले आहे.
दमदार पावसामुळे सीना नदी पुन्हा दुथडी भरुन वाहिली. शहरातील रस्त्यांना नदी नाल्यांचे स्वरुप आले होते. हवामान खात्याने पुन्हा आज व उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
गेल्या महिनाभरापासून अहमदनगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस जोरदार बरसत आहे. दरम्यान पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, नगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नद्यांना पूर आले होते.
त्याच बरोबर शेतकर्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस होत आहे.
शनिवार सकाळपासून उष्णता जाणवत होती. दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास भर मुसळधार पावसाने नगरकरांना झोडपून काढले. आयुर्वेत कॉलेज ते अमरधामपर्यंतच्या रस्त्यावरुन गुडघाभर पाणीे वाहत होते.