कोपरगाव तालुक्यात घारी, चांदेकसारेसह परीसरात १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली असून अर्धा पाऊण तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी ५.३० चे सुमारास विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा सुरू झाला व पावसाला सुरुवात झाली. मोठे टपोरे थेंब अचानक सुरू झाल्यामुळे थोड्याच वेळात उष्णता कमी होऊन गारवा जाणवायला लागला.
जवळपास अर्धा ते पाऊण तास हा पाऊस सुरू होता. एकीकडे नागरिकांना उकाड्यापासून सुटका झाली आहे मात्र, शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनाही फटका बसणार आहे. परिसरात आदल्या दिवशी रात्री देखील आभाळ भरून आले व सोसाट्याचा वारा सुटून विजांचा कडकडाट झाला होता; मात्र पाऊस काही कोसळला नव्हता.
अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारनंतर मात्र पावसाने हजेरी लावलीच. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पावसामुळे या परिसरातील उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.