अहमदनगर शहरासह परिसरात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस यामुळे वीजयंत्रणा कोलमडून पडली. वादळी वारे सुरू झाल्यानंतर वीज खंडित झाली. ती अनेक भागात पहाटेपर्यंत बंद होती. तर काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता.
बुधवारी रात्री सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातनंतर वाऱ्याचा वेग हळूहळू वाढला. रात्री पावणेअकरा वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे असल्याने खबरदारी म्हणून महावितरणने तातडीने वीजपुरवठा खंडित केला.
अनेक ठिकाणी लहान-मोठी झाडे पडली. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील फ्लेक्स वीज तारांवर पडल्याने वीजतारा तुटल्या. दरेवाडीतील हरिमळा भागात मुख्य वाहिनीचे खांब वाकल्याने बारा तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित होता.
गुरुवारी सकाळपासून हे खांब दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय अनेक ठिकाणी लाइन ट्रिप झाल्याने वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. त्याची दुरुस्ती सुरू होती. रात्री पाऊस व वारे थांबल्यानंतर महावितरणने दुरुस्ती सुरु केली
पत्रे उडून महिला जखमी
शेवगाव तालुक्यात वादळाने पत्रे उडून एक महिला गंभीर जखमी झाली. तर इतर तीन व्यक्तींना मार लागला. याशिवाय जामखेडमध्ये केळी व लिंबू बागाचे, तर शेवगाव तालुक्यात डाळिंब, आंबा, केळी, चिकू बागांचे नुकसान झाले.
महावितरणचे नुकसान
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे खांब वाकले, वीजतारा तुटल्या. त्यामुळे महावितरणचे काही प्रमाणात नुकसान झाले. पुढील काही दिवस हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या काळातही महावितरणला सतर्क राहावे लागणार आहे. दरम्यान, मागील वर्षी अवकाळी पावसाने महावितरणचे मोठे नुकसान झाले होते.