अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे सामाईक विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासाहेब शिवराम हजारे हे आपल्या कुटुंबासोबत पिंपळगाव देपा या ठिकाणी राहत आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हजारे यांची पत्नी सामाईक असलेल्या विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेल्या होत्या.
त्याचवेळी सुनीता मारुती हजारे व सविता तुकाराम हजारे (रा. पिंपळगाव देपा) यांनी मोटार चालू करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा प्रकार सोडविण्यासाठी बाबासाहेब हजारे हे आले असता मारुती भानुदास हजारे, तुकाराम भानुदास हजारे, भानुदास मल्हारी हजारे व जनाबाई भानुदास हजारे (चौघे रा. पिंपळगाव देपा) यांनी हजारे यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी बाबासाहेब हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.