Ahmednagar News : समाजाच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. परंतु जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागत तेव्हा भयंकर स्थिती निर्माण होते. अशीही काहीशी घटना घडली आहे.
जामखेडच्या महिलेवर पोलीस व होमगार्डने चोर असल्याचा आरोप करत पैसे उकळले. नंतर पोलिसाने महिलेवर अत्याचार केलाय. ही घटना आष्टावाडी (ता. भूम) येथे घडली. हा प्रकार शुक्रवारी (२ फेब्रुवारी) दुपारी घडला. पोलिस हवालदार डी. एस. भुरके व होमगार्ड एस. सी. माने यांना अटक करण्यात आली आहे.
अधिकी माहिती अशी : जामखेड तालुक्यातील पीडित महिला व तिचा दीर शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास बार्शी येथे जाण्यासाठी भूम बसस्थानकात आले होते. त्यावेळी पोलिस हवालदार डी. एस. भुरके हा दुचाकीवर तेथे आला. त्याने या दोघांची विचारपूस केली असता, आम्ही जामखेडहून आलो असून, वैरागला चालल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर भुरके याने ‘मी पोलिस असून, तुम्ही चोर दिसताय. तुम्हाला पोलिस स्टेशनला घेऊन जातो, असे म्हणून मोबाईलवरुन होमगार्ड एस. सी. माने याला जीपसह बोलावून घेतले.
पीडित महिला व तिच्या दिराला बसस्थानकातून बाहेर घेऊन गेल्यावर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पीडित महिला ही ऊसतोड कामगार असून, तिने मुकादमामार्फत होमगार्ड माने याला ऑनलाईन १० हजार हजार रुपये पाठवले.
त्यानंतर भुरके व माने दोघेही जीपसह तेथून निघुन गेले. नंतर पीडित महिला व दिर बसस्थानकात आले. काही वेळाने हवालदार भुरके परत तेथे आला. त्याने पीडित महिलेला येथे थांबू नका, दुसरे पोलिस घेऊन जातील, असे म्हणत महिला व तिच्या दिराला दुचाकीवरून आष्टावाडी शिवारात नेले.
एका रिक्षाचालकास त्यांना बार्शी येथे सोडण्यास सांगितले, परंतु रिक्षाचालकाने भूम येथे भाडे सोडून परत येतो, असे सांगितल्याने पीडित महिला व तिचा दिर हे तेथेच उभे राहिले.
त्यानंतर भुरके याने पीडित महिलेला ठाण्यात मॅडमला भेटायला चल, असे म्हणत दुचाकीवर बसवून घेऊन गेला. त्यावेळी पौडित महिलेने दिरालाही सोबत घेण्यास सांगितले, परंतु भुरके याने महिलेचे न ऐकता तिला दुचाकीवर घेऊन गेला.
पुढे काही अंतरावर थांबवून रस्त्याच्या कडेला असलेल्या ज्वारीत नेऊन महिलेवर अत्याचार केला. महिलेच्या दिराजवळील ५ हजार रुपये आणि पीडितेकडील २ हजार रुपये घेऊन रिक्षाने त्यांना बार्शीला पाठविले.
सर्व प्रकरणाने घाबरलेल्या पीडितेने हा सर्व प्रकार नातेवाईकांसमोर कथन केला. महिलेने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या फिर्यादीवरून भुरके व माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक केली आहे.