अहमदनगर हादरले ! पत्नीने केला पतीचा धारदार हत्याराने गळा चिरून खून,मृतदेह प्रवरा नदी पात्रात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पत्नीने पतीचा गळा चिरून खून करून त्याचा मृतदेह प्रवरा नदी पात्रात फेकून दिल्याची घटना संगमनेर खूर्द परिसरात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पांडुरंग आबा डामसे (वय ४२ , मुळ रा. कोपरे, ता. जुन्नर, हल्ली रा. संगमनेर खुर्द) हा आपला भाऊ मारुती आबा डामसे, भाऊजई दिपाली मारुती डामसे व पत्नी लिलाबाई यांच्यासोबत संगमनेर खुर्द येथील रमेश पंढरीनाथ सुपेकर यांची शेतजमीन वाट्याने करीत होता.

डामसे कुटुंबीय सर्वजण सुपेकर यांच्या घरासमोरील शेडमधील खोलीत राहतात. पांडुरंग याचा भाऊ मारुती याने वेणुबाई हीचे सोबत लग्न केले होते परंतु घटस्पोट झाल्याने मारुती याने सुमारे तीन वर्षापुर्वी त्यांच्या गावातील दिपाली हीस पळवून आणले.

नोटरी करून संगमनेर खुर्द येथील म्हसोबा मंदिरात लग्न करून पती-पत्नी म्हणून राहत होते. मारुती व त्याची पत्नी दिपाली सुमारे तीन वर्षांपासून संगमनेर खुर्द येथे वाट्याने शेती करत होते.

घरी काम नसल्याने पांडुरंग हा आपली पत्नी लिलाबाई हिच्यासह दोन महिन्यापुर्वी संगमनेर येथे येवून मारुती याचे सोबत वाटयाने शेती करु लागले होते. संगमनेर येथे आल्यानंतर आपल्या भाऊ व भावजय मध्ये भांडणे होत असल्याचे त्यांना समजले.

भांडणामुळे दिपाली ही तिचे माहेरी निमगीरी ता. जुन्नर येथे निघून गेली होती. त्यार दिपाली ही रक्षाबंधनला परत संगमनेर येथे येवून एक दिवस मुक्काम करून मारुती याचेकडून पैसे घेवून दुसऱ्या दिवशी निघून गेली होती.

दि. १३ सप्टेंबर रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी जेवण करत असताना गारुती याला त्याची पत्नी दिपाली हिचा फोन आला. ‘मी म्हसोबा मंदिराजवळ आले आहे. तुम्ही म्हसोबाचे मंदिराजवळ या ‘ असे तिने फोनवर सांगितले. मारुती हा एकटाच म्हसोबाच्या मंदिराकडे निघून गेला.

त्यानंतर बराच वेळ झाला तरी मारुती हा घरी न आल्याने त्याला शोधण्यासाठी सर्व जण म्हसोबाचे मंदिराजवळ गेले. पण तेथे तो दिसला नाही. त्यानंतर मारुती घरी न आल्याने शेती मालक रमेश सुपेकर यांना सांगून त्यांनी मारुती याचा शोध घेतला.

मात्र त्याचा तपास लागला नाही. आज शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या लिलाबाई हिला एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

नदी पात्रामध्ये बारकाईने पाहिले असता पाण्याजवळील खडकावर चप्पलेजवळ रक्ताचे डाग दिसले. यानंतर त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हा मृतदेह मारुती आबा डामसे (वय ४१ ) याचा असल्याचे समजले. त्याचा गळा चिरलेला होता.

याबाबत पांडुरंग डामसे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मयताच्या पत्नीसह अनोळखी अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.