अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट जवळ आज दिनांक ४ डिसेंबर रोजी ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात झाला.
या अपघातात मोटारसायकलवर बसलेल्या तांदुळवाडी येथील बेबीताई म्हसे या जागेवरच ठार झाल्याची दुदैवी घटना घडलीय.
या घटनेतील मयत बेबीताई सुर्यभान म्हसे वय ५८ वर्षे या आज दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी आपल्या नातवा बरोबर मोटारसायकलवर राहुरी कडून तांदुळवाडीकडे जात होत्या. दुपारी दोन वाजे दरम्यान रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट जवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर राहुरीच्या दिशेने येत होता.
गेट जवळील वळणावर अपघातात होऊन ट्रॅक्टरचे चाक बेबीताई म्हसे यांच्या अंगावरून गेले. यावेळी परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेबीताई यांना ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
बेबीताई सुर्यभान म्हसे या तांदूळवाडी येथील माजी सरपंच होत्या. बेबीताई यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, तीन नातू, पाच बहिनी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
बेबीताई या तान्हाजी धसाळ यांच्या धाकट्या बहिण तर रमेश म्हसे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या ऊसाचा सीजन चालू असून जिल्हयातील ऊस कारखान्याचे गाळप चालू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक चालू आहे.
ऊस वाहतूक करताना वाहन मालक कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. डबल ट्रेलर लावून ऊसाची जिवघेणी वाहतूक केली जाते. अवैध ऊस वाहतूकीमुळे बेबीताई यांचा बळी गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.