अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शाळेत मुलांना शिकवले जाते आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालेत. पण हे चित्र पाहल्यानंतर प्रश्न पडतो खरचंच स्वातंत्र्य मिळाले काय ? आतापर्यंत रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पाणंद, डोंगराळ भागातून नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल.
मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना, शाळकरी मुलांना, जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. शेवगाव तालुक्यातील आपेगाव या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. हे गाव ढोर या नदीपात्रामुळे विभागले आहे.
गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना धोकादायक जलप्रवास करावा लागतो आहे. लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनास जाग येणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी केला. का प्रत्येक कामासाठी एखाद्याने जीव गमवावाच लागतो?
ग्रामस्थांनी पोटतिडकीने व्यथा मांडली… गावातील अण्णासाहेब बोराडे यांनी हृदयद्रावक व्यथा मांडली.ते म्हणाले आम्हाला रोज कंबरे इतक्या पाण्यातून वाट करत गावात जावे लागते.
आतापर्यंत पाय घसरून दोन जणांचा जीव गेला आहे. तसेच अनेकांना पाय घसरून लहान-मोठ्या दुःखापती झाल्या आहेत. एका सुशिक्षित तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि राजकीय पुढारी आश्वासन देतात.
आणि अधिकारी लोक कागदावरच प्रस्ताव धाखवतात याच्यापलीकडे आम्हाला अजूनपर्यंत काहीच मिळाले नाही. पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत नेहमीच संघर्ष चालू आहे.
विध्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण – शाळकरी विद्यार्थी दादा शेळके म्हणाला, माझे पप्पा आजारी आहेत.त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसते.
शाळेत जायचे म्हटले की, पालकांना कामधंदा सोडून शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरून जाताना भीती वाटते. कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळादेखील बुडते.
मतदानावर बहिष्कार – शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ,
ज्ञानेश्वर शेळके इत्यादींसह बहुतांश ग्रामस्थांत अगोदर पूल नंतर मतदान असा पवित्रा घेणार आहेत. पूल न झाल्यास येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.