Ahmednagar News : सन 2021 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या मौजे बेलापूर येथील एका व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत गुप्तधन सापडले होते. सदर व्यक्तीने हे गुप्तधन आपल्याला परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या या प्रकरणात माननीय न्यायालयात सुनावणी सुरू असून यामध्ये काय निकाल लागतो याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बेलापूर येथील हरिनारायण प्रेमसुख खटोड यांच्या बेलापूर येथील घरालगत खोदकाम करताना त्यांना एक हंडा सापडला होता.
या हंड्यात गुप्तधन होते. बागेसाठी खोदकाम करताना त्यांना हा हंडा सापडला असून हा त्यांचा वडिलोपार्जित हंडा असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान हे गुप्तधन त्यांना सापडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम श्रीरामपूरचे तहसीलदार व नगरचे जिल्हाधिकारी महोदय यांना माहिती दिली होती. यानंतर मग तहसीलदार महोदय यांनी जुलै 2021 मध्ये याचा पंचनामा केला.
यामध्ये दीड फूट व्यास असणाऱ्या पितळी हंड्यात चार आणे पावली ची 46 नाणे, आठ आणे पावली ची 58 नाणी, उर्दूमध्ये लिहिलेली दोन नाणी तसेच एक रुपयाची 914 नाणी अशी एकूण 1020 नाणी असल्याचे म्हटले गेले होते.
या सर्व नाण्यांचे वजन हे जवळपास अकरा किलोग्रॅम असल्याचे पंचनाम्यात म्हटले गेले होते. या गुप्तधनाची किंमत सात लाख 71 हजार 224 रुपये एवढी असल्याचे पंचनाम्यात लिहिले गेले आहे. सदर नाणी पुरातन असल्याने पुरातत्त्व विभागाकडे जमा आहेत.
दरम्यान खटोड यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत निघालेले हे गुप्तधन परत मिळवण्यासाठी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. एडवोकेट विजय जगताप यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असून यावर सध्या सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणात मंगळवारी अर्थातच 30 एप्रिल 2024 ला झालेल्या सुनावणीत खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी पुढील सुनावणी वेळी पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
7 मे 2024 ला या याचिकेवर पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान मागील सुनावणी वेळी कोर्टाने गुप्तधनाच्या दोन पंचनाम्यात तफावत कस काय झाली असा सवाल उपस्थित केला होता.
एवढेच नाही तर हे गुप्तधन मूळ मालकाला परत करण्याची काय प्रक्रिया आहे, हे स्पष्ट करणारे शपथ पत्र देखील माननीय न्यायालयात सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. यामुळे आता पुढील सुनावणीत माननीय न्यायालय काय सांगते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.