अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- डिग्रस (ता. राहुरी) येथील महिलेच्या कुटुंबाला वेठीस धरणारा व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणारा निलंबित पोलीस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) याच्याविरूध्द राहुरी न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांनी आरोपी लोखंडे विरोधात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्याचा तपास करून प्रत्येकी तीनशे पानी दोषारोपपत्र दाखल केली आहेत.
डिग्रस येथील एका महिलेच्या घराबाहेर 7 ऑक्टोबर 2021 रोजी लोखंडे याने प्रवेश करून त्या महिलेची मुलगी व मुलाला ओलीस ठेवून घरातच डांबून ठेवले. लोखंडे याने बेडरूममध्ये असलेल्या त्या महिलेला बाहेर येण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीच्या कानशिलाला गावठी कट्टा लावला.
ही घटना समजताच पोलीस उपअधीक्षक मिटके हे तातडीने फौजाफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मिटके यांच्यावर आरोपीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, दोन्ही गोळ्या जमिनीच्या दिशेने गेल्या.
याप्रकरणी घटनेतील तरूणी व उपअधीक्षक मिटके यांच्या फिर्यादीवरून आरोपी लोखंडे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्याला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी केला. यामध्ये अनेकांचे जबाब नोंदविले.
दोन्ही गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र तयार केले. दोन्ही दोषारोपपत्र राहुरी न्यायालयात दाखल केले आहे. यामुळे एकाच वेळी निलंबित पोलीस अधिकार्याविरूध्द दोन दोषारोपपत्र दाखल झाले आहेत.