अहमदनगर दक्षिण

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या हक्कासाठी तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.अन्यथा राहुरी तालुक्यातील शेतकरी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांच्यावतीने महसूल प्रशासनाला देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले, सुरत एक्सप्रेस ग्रीनफील्ड अहमदनगर, नाशिक या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या बागायती व फळझाडे असणारे क्षेत्र संपादित करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आल्या आहेत.

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता तसेच शेतकर्‍यांच्या हरकती विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. बागायती जमिनीबाबत राजपत्रात जमिनीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात.

जमिनीच्या मोबदल्या बाबत जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, नंतरच पुढील कार्यवाही करावी. 7/12 उतार्‍यावरील हुकुमशाही पद्धतीने केलेल्या नोंदीबाबत शेतकर्‍यांच्या मालकीच्या जमिनीच्या 7/12 उतार्‍यावर घेतलेल्या हरकतीच्या मुद्यांवर कोणतीही चर्चा न करता 7/12 उतार्‍याच्या इतर हक्कात केलेली महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी.

सर्विस रोडबाबत शेतकर्‍यांच्या शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोड व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. याबाबत सकारात्मक विचार न झाल्यास दि. 30 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office