अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलन करणार होते. मात्र ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव मंजूर करण्यात आल्याने त्यानी सोमवारी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरकारला दिला.
त्यानंतर सरकारच्या वतीने अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. यासाठी राज्य उत्पादन शुल्क च्या सचिव वंदना कृष्णा यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
या सचिवांकडून अण्णा हजारे यांना लेखी पत्र देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने हा कायदा राबवणे आणि जनतेतून हरकती मागवल्या जातील असं आश्वासन दिले आहे.
त्यानंतर आज (१३ फेब्रुवारी) राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत अण्णा हजारे यांनी नियोजित उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
सरकारने ९० दिवसांत या निर्णयावर जनतेचे मत जाऊन घ्यावे आणि त्यांनतर अंतिम निर्णय घ्यावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर उपोषण न करण्याबाबत अण्णा हजारे यांना विनंती करण्यात आली.
त्यानुसार हजारे यांनी उद्यापासून करण्यात येणारे उपोषण स्थगित केलं आहे. “या पुढे सरकारने आपल्या मनाने कोणतेही निर्णय घेऊन जनतेवर लादू नयेत, तसं झाले तर ग्रामसभा आंदोलन करतील.
केवळ राळेगणसिद्धी नव्हे, राज्यातील सर्व गावात असे निर्णय घ्या. सरकारने यापुढे प्रत्येक ग्रामसभेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, असा राळेगणसिद्धी ग्रामसभेचा निर्णय घेण्यात आला.
तसंच पुढील तीन महिन्यात वाईनसंबंधी जनमत जाणून घ्या. लोक नको म्हणाले, तर निर्णय रद्द करा,” असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम