बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला !

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- सेवा सोसायटीची मते बाजार समितीसाठी महत्त्वाची आहेत, त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी वातावरण तयार करायचे आहे.

त्यामुळे बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा, गावोगावी युवा सेनेच्या शाखा स्थापन करा, असे आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नगर बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, संदेश कार्ले, युवा नेते प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, रामदास भोर, गुलाब शिंदे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, विश्वास जाधव, प्रकाश कुलट आदी उपस्थित होते.

प्रा. गाडे म्हणाले, मी तालुक्यातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पण जे करायचे ते शेतकऱ्यांसाठी. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व संस्थाची वाट लागली आहे, तालुका सहकारी साखर कारखाना राहिला नाही,

दूध संघ शेतकऱ्यांचा राहिला नाही. तेथील जागा विकून मोठे मोठे शॉप तयार झालेले दिसतात. जागा कोणी विकली, जागा विक्रीत कसा भ्रष्टाचार झाला सर्वांना माहिती आहे.

तालुका खरेदी-विक्री संघाची अवस्था दयनीय आहे. एकमेव राहिलेल्या बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे. जेथे दिसेल तेथील जागा विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असा आरोपही गाडे यांनी केला.