पारनेर पोलिस निरीक्षकांची शेतकऱ्याला धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर – कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पारनेरच्या पोलिस निरीक्षकांविरुद्ध थेट मुख्यमंत्री सचिवालय व विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, वनकुटे येथील १८ एकर जमिनीच्या वादावर न्यायालयाने रोहिदास देशमुख यास शेतात जाण्यास निरंतर मनाई केली होती. असे असताना न्यायालयाचा अवमान करून प्रवेश केला. तसेच पोलिसांत सहा जणांविरुद्ध तक्रार दिली होती.

त्यानंतर पारनेरचे पोलिस निरीक्षक पोवार यांनी तक्रार अर्जात असलेल्या व्यक्तींना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यावेळी पोवार यांनी बाळासाहेब माळी यांना ५ लाख द्या अन्यथा तुमची पत्नी व मुलाला अटक करु, अशी धमकी दिली. त्यावेळी माळी यांच्या खिशातील 25 हजार रूपये काढून घेऊन दोन दिवस पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. जाणीवपूर्वक अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. 

या खोट्या गुन्ह्यात फिर्यादीबरोबर तडजोड करून देतो मी मध्यस्थी करतो, असे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास गावातून धिंड काढेन अशी धमकी दिली, असे निवेदनात म्हटले आहे. पैसे न दिल्याने पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांनी देशमुख याच्याबरोबर संगणमत करुन गुन्हा दाखल केल्याचे माळी यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24