ऑनलाइन वाहन खरेदी पडली महागात ! न्यायालयाने दिले हे आदेश……….

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी येथील एका व्यक्तीची अज्ञात आरोपीकडून फेसबुकवर जुनी गाडी विक्रीच्या उद्देशातून ४८ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात संतोष सखाराम मोरे (रा. राहुरी) यांनी नगरच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे.

ही रक्कम परत मिळण्यासाठी राहुरी न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पीडित व्यक्तीला रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी येथील संतोष सखाराम मोरे असे ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मोरे यांनी नवीन चारचाकी वाहन खरेदीची ऐपत नसल्याने, त्यांनी फेसबुकवर जुनी वॅगनोर गाडी विक्रीची जाहिरात पाहिली. त्यांना गाडी पसंद पडली व त्यांनी जाहिरातीवर असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला.

अनोळखी व्यक्तीसोबत मोरे यांचा ४८ हजार रुपयांचा व्यवहार ठरला. तसेच पुढे अनोळखी व्यक्तीने आर.सी. बुक व इतर कागदपत्रे पाठवून मोरे यांना विश्वासात घेतले असता, मोरे यांनी ठरलेली रक्कम अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर ऑनलाईन पाठविली.

त्यांनतर मोरे यांनी रक्कम टाकल्यानंतर त्या व्यक्तीला फोन केला असता, अनोळखी व्यक्तीने मोबाईल नंबर बंद केला व मोरे यांना गाडी ही मिळाली नाही. या घटनेनंतर मोरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी नगरच्या सायबर क्राईम विभागात धाव घेतली.

नगरच्या सायबर क्राईम विभागाने तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी शोध केला. नंतर पोलिसांना ही रक्कम पंजाब नॅशनल बॅंक, शाखा जुहेरा, जि. भरतपूर, राज्य राजस्थान येथे जमा झाल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून त्यावर जमा केलेली रक्कम गोठविली. ही रक्कम परत मिळण्यासाठी मोरे यांनी राहुरी न्यायालयात याचिका दाखल केली असता, या याचिकेवर न्यायालयाने पीडित व्यक्तीला रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.