अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- नगर-वांबोरी रस्त्यावर नगरवेस समोरील करपरा नदीच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. वांबोरीतील ग्रामस्थांनी या खड्ड्याला रांगोळी काढून विधिवत पूजन करून नारळ वाढवून गांधीगिरी केली.
रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वांबोरीचे माजी उपसरपंच राजेंद्र पटारे यांनी दिला. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने वांबोरीतील करपरा नदीला अचानक पूर आला.
या पुरामुळे वांबोरी तील नगरवेस परिसरातील नदीवर बांधलेल्या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. राहिलेल्या अर्ध्या रस्त्यातही खोल खड्डे पडले. त्यामुळे हा पूल वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय धोकादायक बनला असून या पुलाची दुरुस्ती करावी,
अशी मागणी वारंवार नागरिकांमधून होत असून याविषयी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा वांबोरी ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे अर्धनग्न आंदोलन छेडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच राजेंद्र पटारे यांनी दिला.