अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज बिलापोटी अचानकपणे बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण कार्यालयात धरणे आंदोलन केले.
महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करीत शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंताना घेराव घातला. सध्या थोडा अवकाळी पाऊस झाल्याने पिके टिकली असून, येत्या दोन तीन दिवसात पाणी न मिळाल्यास शेतीत लावलेल्या पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट करुन काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांपुढे विद्युत पुरवठा त्वरित सुरु करण्यासाठी अक्षरश: हात जोडले.
वीज कंपनीने विविध वीज वसुलीचा मुद्दा घेऊन गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अचानकपणे शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा बंद केला आहे.
यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ग्रामीण भागांमध्ये पिकांना पाणी देण्याचे अत्यंत आवश्यकता भासत आहे. पिकांना पाणी न दिल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे पिके धोक्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महावितरणने शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करुन त्यांना अडचणीत आनले असल्याचे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
महावितरणकडून दोन वीज बिलाची वसुली केली जात असून, अन्यथा शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यावर्षी शेतकरी कोरोना व अतिवृष्टीच्या संकटातून थोडा सावरत असून, त्याला महावितरणने सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. अशी मागणी करण्यात आली.