अखेर कर्जत तालुक्यातील ‘त्या’देवस्थानचे जुने ट्रस्ट केले बरखास्त..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या १०२ एकर या वर्ग ३ च्या जमीनीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी मंजुरी दिली असून, पूर्वीचे ट्रस्ट बरखास्त केले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.

कर्जत येथे पिर हजरत दावल मलिक या देवस्थानासाठी शासनाने पूर्वी दिलेली एकशे दोन एकर जमीन असून, सदर जमिनीतील काही जमीन विकण्यात आली आहे.

या देवस्थानच्या जागेबाबत कर्जत येथील तौसिफ शेख याने मोठा लढा उभारून निवेदन, उपोषण आंदोलन केले मात्र प्रशासन योग्य साथ देत नसल्याने अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करून आत्म समर्पण केले.

यानंतर या जागेबाबत मुस्लिम समाजाने सातत्याने पाठपुरावा करून सदर जागेच्या व्यवस्थापनासाठी कमिटी स्थापन करून कायदेशीर लढा उभारला. व या लढ्यास यश आले असून पिर हजरत दावल मलीक कर्जतच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ नुसार योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

याबाबत झालेल्या आदेशात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी दिलेल्या आदेशात अर्जदार मजीद खान यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर केला असून सादर करण्यात आलेली व्यवस्थापन योजना योग्य,

पारदर्शी व सर्व समावेशक असून वक्फ संस्थेचा कारभार पारदर्शीपणे करता येवु शकेल यासाठी व्यवस्थापन योजनेत आवश्यक किरकोळ तांत्रिक स्वरूपाचे फेरबदल करून योजना मंजूर करण्यात यावी.

अशा निष्कर्षाप्रत वक्फ बोर्ड पोहचले असल्याने त्यांनी याबाबत आदेश काढला असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.