अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- परळीकडून आलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहक लाईन मधून मोठा आवाज होऊन एक ठिणगी पडली अन काही क्षणात लागलेल्या या आगीत पाच शेतकऱ्यांचा १५ एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.
ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात घडली. या आगीत जवळपास १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारातील राधाकिसन निवृत्ती आव्हाड यांच्या जमिनीमधून वैजनाथ परळीकडून गेलेल्या उच्च दाबाची वीजवाहक लाईनमधून मोठा आवाज होऊन एक ठिणगी पडल्याने या उसाला आग लागली.
या आगीमध्ये राधाकिसन निवृत्ती आव्हाड (३ एकर) भगवान निवृत्ती आव्हाड ( ३ एकर) जनार्दन कारभारी आव्हाड (२ एकर) नवनाथ आव्हाड (३ एकर) अर्जुन रघुनाथ आव्हाड (२ एकर) दिलीप पोपट आव्हाड(२ एकर) असे पंधरा ते वीस एकर जमिनीमधील ऊस या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग इतकी भीषण होती की शेतकऱ्यांना त्याआगी पर्यंत पोहोचता आले नाही.
त्यामुळे एका शेतातील आग ही संपूर्ण पंधरा ते वीस एकर आला लागली तीन ते चार तासानंतर आग विझविण्यास शेतकऱ्यांना यश आले. या परिसरात अशीच घटना यापूर्वी घडली होती.