अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही लाटेस जिल्ह्याबाहेरच रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये लसीकरण करणे कामी हलगर्जीपणा केल्याची बाब मुख्याधिकारी अथवा नगर परिषदेच्या पथकाच्या लक्षात आल्यास त्यांचे दुकान,
आस्थापना अनिश्चित काळासाठी सील करण्यात येईल. असा इशारा जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, शहरातील सर्व व्यवसायीकासह कामगार किंवा संबंधित व्यक्ती यांनी कोरोना लसीकरण केले किंवा नाही याबाबत जामखेड नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वेक्षण केलेले आहे.
शासनाने विहीत केलेल्या वयोगटातील ज्या व्यक्तींनी लसीकरण करून घेतले नाही, त्यांना कोरोना प्रतिबंधक उपाय योजना म्हणून लसीकरण करून घेणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व दुकानदार, कामगार किंवा संबंधित व्यक्ती व त्यांच्याकडे येणार अभ्यागत किंवा ग्राहक यांनी संपुर्ण लसीकरण केलेले हवे असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
संपुर्ण लसीकरण म्हणजे लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्या आहेत व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण अशी कोणतीही व्यक्ती, ज्या व्यक्तीची वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरचे प्रमाणपत्र आहे.
अशी कोणतीही व्यक्ती १८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती. वरील प्रमाणे संबंधित असलेल्यांनी संपुर्ण लसीकरण करणे कामी हलगर्जीपणा केल्याची बाब निदर्शनास आल्यास ते दुकान अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे.