मुलींनीच वडिलांना खांदा देत दिला मुखाग्नी …!अखेर वडिलांचे ‘ते’ शब्द सार्थ ठरवले..

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शक्यतो अंत्यसंस्काराचे सर्व विधी मुलगा (पुरुष) करतो. मात्र या रूढी, परंपरांना फाटा देऊन वडिलांना मुखाग्नी देत सहा मुलींनी खांदा देत सर्व विधी पार पाडले.

ही घटना राहुरी तालुक्यात घडली. सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव यादव घोरपडे हे नेहमी ‘माझ्या मुली मुलांप्रमाणे आहेत’, असे म्हणायचे, अखेर त्याच मुलींनी त्यांच्या अंतिम सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्याने उपस्थितांना देखील गहिवरून आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निधनानंतर मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, मुखाग्नी कोण देणार? अशी चर्चा केली जात असताना त्यांच्या सहा मुलींनी आदर्शवत कार्य केले.

घोरपडे हे नेहमी माझ्या मुली याच माझे मुले आहेत हे सांगत असे. तेच शब्द लक्षात घेत मुली शामबाला माने, सारिता मोहिते, माधुरी ढोबळे, मनिषा मांडगुळे, कल्पना फाटके, आशा मोहिते यांच्यासह आई सुमनताई घोरपडे यांनी सर्व विधी पार पाडले.

समाजामध्ये वंशाला दिव्यासाठी मुलगाच हवा, पैसा, संपत्ती, घर, पैसा, शेतीला वारस म्हणून मुलांचा हव्यास केला जातो; परंतु घोरपडे दाम्पत्याने मुलींना मुलांप्रमाणेच प्रेम दिले.

ग्रामिण भागामध्ये असलेल्या रुढी, परंपरा याला फाटा देत त्याच मुलींनी वडीलांच्या अंत्यविधीवेळी मुलांपेक्षा मुलीदेखील कमी नाहीत, हे दाखवून देत सर्व जबाबदाऱ्या पार पाडत समाजापुढे आदर्श निर्माण केला.