Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील येथील बहुचर्चित रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर डॉ. मोरेला पुन्हा दि.१५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याचवेळी वनविभागाने भास्कर मोरेला हरीण पाळल्याच्या दाखल गुन्ह्यात ताब्यात घेत दि १६ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. विद्यार्थी व नागरिकांच्या तक्रारींनंतर वनविभागाने दि.१० मार्च रोजी रत्नदीप मेडिकल कॉलेज परिसरात पाहणी केली असता एक जखमी हरीण आढळून आले होते.
यानुसार वनविभागाने डॉ. भास्कर मोरे विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या भागात अनेक हरीण मारून पुरल्याची नागरिकांनी तक्रार होती. त्या अनुषंगाने जेसीबीच्या साहाय्याने अनेक ठिकाणी खोदकाम करून शोधकार्य केले असता काही प्राण्यांचे केस व एक हाड आढळून आले होते.
ते तपासणीसाठी नागपूर येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहे. अद्याप याबाबतचा अहवाल येणे बाकी आहे असे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले.