Jaamkhed News : गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा फरार झाला होता. त्याने तीन दिवसांत सात मोबाइल बदलले. पोलिसांना चकवा देण्यात यशस्वीही होत होता.
तो पुणे, सातारा येथून पळसदेव येथे पाहुण्यांकडे आला. पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांची कुणकुण लागताच तो उसाच्या शेतात पळाला. दहा तासांच्या शोध मोहिमेनंतर मोरे याला उसाच्या शेतातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
जामखेड येथील रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली. एका पथकाने मोरे याचा त्याच्या नातेवाइकांकडे शोध घेतला.
दुसऱ्या पथकाने जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, बारामती, पुणे यासह आदी ठिकाणी तपास घेतला. तांत्रिक विश्लेषणानुसार पथकाने पुणे, बारामती आदीच्या भागात आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपीने या काळात सात मोबाइल बदलले.
त्यामुळे पोलिसांना सुगावा लागत नव्हता. त्यानंतर मोरे हा त्याच्या नातेवाइकांकडे पळसदेव (भिगवन, जि. पुणे) येथे गेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक तातडीने पळसदेवला रवाना झाले.
परंतु, पोलिस पोहोचण्याअधीच तो सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात पळून गेला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेतात शोध सुरू केला, मात्र तो मिळून येत नव्हता.
अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपीला गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेतातून अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, तुषार धाकराव, बबन मखरे, भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे आदींनी केली.