४ जानेवारी २०२५ जामखेड : तालुक्यातील एका गावात एक ते दीड महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्या दोन रोडरोमिओंना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकविला. ग्रामस्थांनी पाळत ठेवून या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या रोडरोमिओला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मेहबूब गणी शेख (रा. जवळा, ता. जामखेड) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे तर दुसरा अनोळखी तरुण पसार आहे.जामखेड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला मेहबूब शेख हा मागील एक ते दीड महिन्यापासून त्रास देत होता.
सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या घरच्यांना सांगितली.
त्यानतंर ३१ डिसेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यावर पीडित मुलगी व तिची मैत्रिण घरी जात असताना आरोपीने त्यांच्या मागे जात तिची छेड काढत तिला मोटारसायकल आडवी लावली.
तसेच तिला चॉकलेट देत मला तू आवडतेस, असं म्हणाला. यावेळी पीडित मुलीने व तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आरोपी व त्यांच्या मित्राने मुलीच्या अंगावर चॉकलेट फेकून देत हिच्याकडे बघून घेऊ असं म्हणत हळगावच्या दिशेने धूम ठोकली.
त्यानतंर घडलेला सर्व प्रकार पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या आई- वडिलांना सांगितला. त्यानतंर काही ग्रामस्थांनी आरोपीच्या मागावर जाऊन त्याच्यावर पाळत ठेवली व त्यास पकडून ठेवले. ही माहिती पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.आरोपीस बुधवारी १ जानेवारी रोजी श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवलकर हे करत आहेत.