अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- तालुक्यातील जवखडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू आहे.
विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी खटल्याच्या अंतिम युक्तीवादास मंगळवारी १८ तारखेला सुरूवात केली होती. या खटल्यातील साक्षीदारांपैकी सात साक्षीदारांच्या मुख्य सरतपासणी, उलट तपासणी, घटनास्थळाचे पंचनामे हे कसे शाबित होता, हे निवेदन पहिल्या दिवशी देण्यात आले.
तसेच या खटल्यात 53 साक्षीदारांच्या साक्षी सरकारी पक्षाच्या वतीने नोंदविण्यात आल्या आहेत. कुऱ्हाड, कोयता, करवत, लाकडी काठी, खोऱ्या या शस्त्रांच्या सहाय्याने मयतास जखम होऊ शकते किंवा कसे याबाबत तज्ञ साक्षीदार डॉ. हर्षद ठुबे यांच्या दाखल्याच्या आधारे युक्तीवाद करण्यात आला.
तसेच या गुन्ह्याचे तपासी अधिकारी डॉ. शरद बोर्डे यांनी केलेले पंचनामे, घटनास्थळी लाकडी काठी, बॅटरी, मयत संजयची राजदूत, कपडे आदी अनुषंगाने सरतपासणी आणि उलट तपासणीवर युक्तीवाद करण्यात आला.
नेमके प्रकरण काय होते? तालुक्यातील जवखेडे खालसा इथं 20 ऑक्टोबर 2014 च्या मध्यरात्री संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील संजय जाधव यांची हत्या करण्यात आली होती.
या दलित हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. आधी हे हत्याकांड दलित-सवर्ण वादातून घडल्याच्या संशयाने आरोपीविरुद्ध अँट्रोसिटीचे कलम लावण्यात आले होते.
पोलिसांची तब्बल 11 पथके या हत्यांकाडाच्या तपासासाठी पाठविली होती. तीन महिने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके यांनी पाथर्डीत तळ ठोकला होता.
घटनेचा संपूर्ण तपास आणि नार्को चाचणीनंतर आरोपी जवळचे असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी प्रशांत जाधव आणि त्यानंतर अशोक आणि दिलीप जाधवला अटक केली होती.