कर्जत

चक्क पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रांताधिकार्‍यांना शिवीगाळ; या ठिकाणी घडली घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना पोलीस कर्मचारी वाळू तस्कर केशव व्हरकटे याने शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे व मंडळाधिकारी बाळासाहेब सुद्रिक, तलाठी केसकर व रवि लोखंडे यांना बोलावून घेतले.

त्यानंतर प्रांताधिकारी यांचे पथक रमेश जनार्दन कोळेकर यांच्या घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कारवाईसाठी गेले. तेथे त्यांना ३ ब्रास वाळूने भरलेला ट्रक आढळून आला. त्यावेळी तेथे केशव व्हरकटे उभा होता. त्यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी त्याचे व्हिडीओ चित्रीकरण काढण्यास सुरुवात केली.

त्यावेळी व्हरकटे याने ट्रक प्रांताधिकारी कार्यालयात घेऊन जाण्यास सहमती दाखवली. त्यानुसार थोरबोले हे ट्रक समोरून बाजूला होताच व्हरकटे याने चालकाला चिथावणी देऊन ट्रक पळून नेण्यास सांगितले तसेच त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर व्हरकटे निघून गेला. त्याच्याविरुद्ध भांडेवाडी येथे राहणारे तलाठी दीपक बिरुटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office