अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यात आल्यावर देखील मला पारनेर मतदार संघामध्येच असल्याचे जाणवते. मित्र परिवाराच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही माझी आवड आहे.
मात्र याची देखील काहींना पोटदुखी होते, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता आमदार नीलेश लंके यांनी लगावला. तालुक्यातील टाकळी माणूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे माजी चेअरमन गहिनीनाथ शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,सभापती गोकुळ दौंड, भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अजित चौनापुरे, बीड पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ दौंड, अर्जुन धायतडक, डॉ. राजेंद्र खेडकर,
शिवसेनेचे रफिक शेख, माजी जि. प. सदस्य उज्ज्वला शिरसाठ आदी उपस्थित होते. ॲड.ढाकणे म्हणाले, सरळ असणारी झाडे तोडायला सोपी जातात. या प्रमाणे मी देखील सरळ राजकारण केले. याचा वाईट अनुभव आला असला तरीदेखील आम्ही समाधानी आहे. शिरसाट यांचा मित्रपरिवार राज्यभरात आहे.
अगदी कमी वयामध्ये मोठा मित्रपरिवार मिळवणे ही कौतुकाची बाब आहे. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात याच टाकळी मानूर गटातून झाली होती. यामुळे आगामी काळ हा शिरसाठ सुवर्णकाळ राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वला शिरसाठ, सूत्रसंचालन आजिनाथ शिरसाठ यांनी करून आभार गहिनीनाथ शिरसाट यांनी मानले.