अहमदनगर :- घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मिथुन उबऱ्या काळे (वय १९, रा. सुरेगाव, ता.श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. विसापूर फाटा (ता.श्रीगोंदा) येथून आरोपीला पकडण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. चास येथील माजी सैनिक संभाजी इंद्रभान कार्ले यांच्या घरी २१ जानेवारी २०१९ रोजी चोरी झाली होती.
घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ३५ हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरविली. मिथुन उबऱ्या काळे हा घरफोडीचा सूत्रधार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार विसापूर फाटा येथे सापळा रचण्यात आला. या सापळ्यात मिथुन काळेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला. चौकशीअंती काळे याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली.