Ahmednagar Breaking : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सहा महिने थांबून देखील सरकारी काम पूर्ण होत नाही. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा तसेच शासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे पाहायला मिळते.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शासनाच धोरण यांची पोलखोल झाली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गेल्यावर्षीच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची बाब समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मौजे कामरगाव येथे जास्तीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या गावातील 102 शेतकरी बांधवांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले असून 72 हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले होते.
या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. यामुळे कृषी सहाय्यक व तलाठ्या मार्फत संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सदर पंचनाम्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आला. या अहवालात 10 लाख 26 हजार रुपयांची नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांना वर्ग केले जावे असे नमूद होते.
तहसील कार्यालयातून हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत व पुनर्वसन विभागकडे सदर अहवाल प्रलंबित आहे. आता जवळपास एक वर्षे उलटला तरी देखील यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. बाधित शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.
अशा परिस्थितीत सरपंच तुकाराम कातोरे यांच्या समवेत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांना संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी या अनुषंगाने एक लेखी निवेदन देण्यात आले आहे.
यामुळे या निवेदनावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे कामरगाव ग्रामपंचायतचे तसेच बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे आता बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.