अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- अहमदनगरमध्ये दि. २६ ते ३० जानेवारी २०२२ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली.
हा लोकशाही उत्सव दरवर्षी प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हौतात्म्यदिन या दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव अर्शद शेख यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राजकीय व व्यावहारिक पातळीवर अनेक अंगाने लोकशाहीला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
देशपातळीवर धर्मांधता आणि भांडवलदारी व्यवस्थेचे उदात्तीकरण सुरु आहे. अशावेळी हुकुमशाही, राजेशाही व्यवस्थेला नाकारणारी व सर्वसामान्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यास कटिबद्ध असलेली आपली लोकशाही टिकली पाहिजे
व ती तळागाळात झिरपली पाहिजे हा हेतू समोर ठेऊन लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची सांगता ३० जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता रहेमत सुलतान हॉल, सर्जेपुरा येथे साहीर लुधियानवी यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने होईल, अशी माहिती समितीचे खजिनदार अशोक सब्बन यांनी दिली.