अहमदनगर दक्षिण

अहमदनगर जिल्ह्यात फसवणूकीचा नवा फंडा; सात जणांनी घातला ७ कोटी ६९ लाखाला गंडा !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून बिग मी इंडिया कंपनी अंतर्गत फंडपे वॉलेटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून 61 लोकांना सात कोटी 68 लाख 64 हजार पाचशे रुपयाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात कंपनीशी संबंधित सात जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश बाबुराव खोडवे (वय 38 रा. कागल जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

सोमनाथ एकनाथ राऊत व त्याची पत्नी सोनिया सोमनाथ राऊत (रा. पाईपलाईनरोड, सावेडी) कंपनीचे सीईओ वंदना पालवे, बिजनेस मॅनेजर प्रीतम शिंदे व शालमन गायकवाड, सेल्स मॅनेजर प्रीती शिंदे, सपोर्ट मॅनेजर सुप्रिया आरेकर अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आरोपी सोमनाथ राऊत याने फिर्यादी सतीश खोडवे यांच्याशी डिजिटल मॅक्झिनमध्ये जाहिरात देण्यासाठी ओळख निर्माण केली. यानंतर फिर्यादी यांना राऊत याने जाहिरात दिली.

राऊत याने खोडवे यांना कंपनीत पैसे गुंतविण्याची विनंती केली. खोडवे यांनीही विश्वास ठेवून सुरूवातीला एक लाख गुंतवणूक केली. त्याचे प्रति दिन ३०० रुपये कमिशन खोडवे यांना मिळाले.

अधिक गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष राऊत याने खोडवे यांना दाखवले. यामुळे राऊत यांनी एक कोटी 56 लाख रुपये अशी रक्कम गुंतवली.

सुरुवातीला राऊत याने खोडवे यांना कमिशनचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले. परंतु 29 ऑगस्ट 2021 पासून राऊत हा त्याच्या पत्नीसह पसार झाला आहे. त्याचे पाइपलाईनरोड येथील कार्यालयही बंद असून त्याने माझ्यासह एकूण 61 लोकांची फसवणूक केल्याचे खोडवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

ही फसवणूकीची रक्कम सात कोटी 68 लाख 64 हजार पाचशे रुपये आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करत आहे.

Ahmednagarlive24 Office