पारनेर :- तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात सोमवारी दुपारी संशयास्पद स्थितीत आढळला असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
ते सकाळी त्यांच्या वस्तीमागील शेरी येथे लसूण व कांद्यास पाणी देण्यासाठी गेले होते. थोडेच पीक असल्याने ते बराच वेळ का थांबले, म्हणून त्यांची पत्नी दुपारी साडेतीनच्या सुमारास तेथे गेली असता चौधरी शेतात पडलेले आढळले. त्यांनी गावात माहिती दिल्यानंतर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला.
मांडीखाली दोन्ही पायांवर जखमा…
ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांनी मृतदेहाची पाहणी केली असता चौधरींच्या मांडीखाली दोन्ही पायांवर जखमा आढळल्या. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे उत्तर मिळत नसल्याने मृतदेह ससून रूग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे.