पारनेर

Breaking : गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी, दुःखाचा डोंगर

Published by
Ahmednagarlive24 Office

पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, सांगवी सूर्या, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर या परिसराला रविवारी (दि. २६) अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला.

गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह डाळींब, केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. कांदा पिकासह रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसला आहे. दरम्यान गारपिटीमुळे पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना पारनेरात घडली.

आधीच विविध जाचक अटींमुळे पोल्ट्री व्यायसायिक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आणि त्यात आता अस्मानी संकटाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुठे घडली घटना ?

निघोज येथील रहिवासी पांडुरंग पवार यांचे पोल्ट्री शेड आहे. यात ९ हजार पक्ष्यांची क्षमता आहे. रविवार सायंकाळी ४ वाजता जोरदार गारपीट होत अस्मानी संकट कोसळले.

या गारपिटीने ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडून मोठी हानी पवार यांची झाली. वाऱ्याने शेडचे पडदे देखील फाटले होते. या शेतकरीसोबतच तालुक्यातील विविध ठिकाणच्या पोल्ट्री व्यवसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती समजली होती.

संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पारनेर तालुका अध्यक्ष सर्जेराव भोसले यांनी अहमदनगर पशुसंवर्धन विभागाकडे केली आहे.

मोठे नुकसान

फक्त पाउस पडला असता तर नुकसानीचे प्रमाण अत्यल्प राहिले असते. गारा पडल्याने सर्वाधिक शेतीचे नुकसान झाले. निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गाडीलगाव, पठारवाडी, गांजीभोयरे, सांगवीसुर्या, वडगाव, शिरापुर, वडनेर देवीभोयरे या परिसरातील

कांदा उत्पादक शेतकरी या वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने पुर्णपणे हतबल झाला असून सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना एकरी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी जनतेतून होत आहे. यामध्ये लिंबाच्या बागा पुर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Breaking