अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून झालेल्या खूनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी नामंजूर केला आहे. अमोल भाऊसाहेब कर्डिले (वय 33 रा. कुरूंद ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी, अॅड. सुरेश लगड व अॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.कुरूंद ग्रामपंचायत निवडणूकीत जयवंत मंजाब नरवडे व अनिल दशरथ कर्डिले हे एकमेकांविरूध्द उभे राहिले होते.
त्यामध्ये जयवंत नरवडे हे पराभूत झाल्याने, 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी अनिल कर्डिले, अमोल कर्डिले, सागर भाऊसाहेब कर्डिले, विवेक उर्फ पिंट्या अरूण कर्डिले, अविनाश निलेश कर्डिले, राजु दत्तु शेळके,
राजेंद्र साहेबराव कर्डिले, पंकज अनिल कर्डिले, सुहास गोरख थोरात, आकाश निलेश कर्डिले व रमेश महादु नरवडे (सर्व रा. कुरूंद) यांनी नरवडे वस्ती येथे जाऊन जयवंत नरवडे यांना, तू आमचे विरोधात निवडणुकीत उभा राहातो काय ? असे कारण काढून तलवारीने व काठ्याने मारहाण केली.
जयवंत यांना गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे.
सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालय येथे वर्ग झाल्याने त्या ठिकाणी आरोपी अमोल कर्डिले याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकुन घेऊन न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला आहे.