Parner News : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी खडकवाडीच्या सरपंच सौ. शोभा शिंदे यांनी उपअभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मांडओहळ धरणावर अनाधिकृत उपसा योजनांचे जाळे पसरले असून, पाणीपरवानगी एकाच्या नावावर घेऊन पुढे तो बागायतदार इतर शेतकऱ्यांना परस्पर फाटे फोडून पाणी विकतो, त्याची नोंद होत नाही, त्यामुळे शासनास पाण्याची पट्टी मिळत नाही,
प्रत्येक उपसा सिंचन योजनेची अंतर्गत तपासणी होणे आवश्यक आहे तरच हा घोटाळा बाहेर येईल तसेच टंचाईच्या वेळेस विज पुरवठा खंडित करण्याबाबत विज मंडळास कळविले जाते,तेव्हा प्रत्यक्षात कार्यवाही झाली का नाही, हे खात्याकडून पाहिले जात नाही,
आम्ही पत्र दिले असे सांगून कागदी घोडे नाचवली जातात, याचा फायदा वीज मंडळ घेते, काही शेतकरी पुणे जिल्ह्यातील व नगर जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी कनेक्शन घेऊन विजेचा गैरवापर करतात, यासाठी टंचाई काळात भरारी पथक नेमूना काळजी घेणे आवश्यक आहे.
मांडओहळ प्रकल्पातुन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उपसा जलसिंचन योजना सुरू असल्याने लाभक्षेत्रातील वासुंदे, खडकवाडी, पळशी, या गावांतील जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते;
परंतु या सुरू असलेल्या अनाधिकृत उपसासिंचन योजना व विसर्गाची अनियमितता, यामुळे लाभधारक शेतकरी पाण्याची मागणी करण्यास कुचराई करत असल्याने लाभक्षेत्रातील केवळ ५०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे.
उर्वरित शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मांडओहळ धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने कालवा, अस्तरीकरण यावर करोडो रूपयांचा खर्च केला असून,
हा अनाधिकृत पाणी उपसा सुरू राहिल्यास शासनाने केलेला करोडो रूपयांचा खर्च वाया जाईल व ज्या उद्देशाने धरण बनविण्यात आले,
ते लाभार्थी शेतकरी या प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहतील, त्यामुळे या प्रकल्पातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्यात येऊन लाभक्षेत्रात गलशेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दुर करावा, अशी मागणी खडकवाडी ग्रामस्थांनी केली आहे.