Ahilyanagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून आपापल्या परीने फिल्डिंग लावणे सुरू आहे.
जागा वाटपाचा प्रश्न तसेच इच्छुकांची प्रत्येक मतदार संघात होणारी भाऊ गर्दी, काही विधानसभा मतदारसंघांच्या जागा वाटपाबाबत वेगवेगळ्या पक्षांमध्ये होणारी ओढाताण, पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर जागावाटपा संदर्भात होत असलेल्या बैठका या सगळ्या गोष्टींमुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघायला लागले आहे.
अगदी याचप्रमाणे अजित पवार यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी पारनेर येथे राष्ट्रवादीचा मेळावा घेतला.
या मेळाव्याप्रसंगी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या पराभव ते इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या मेळाव्याला काशिनाथ दाते, सुजित झावरे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, माधवराव लामखेडे तसेच जिल्हाध्यक्ष अशोक सावंत इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
काय म्हणाले अजित पवार?
पारनेर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मतदारांकडून अपेक्षित असलेला कौल मिळाला नाही. विरोधकांकडून संविधान बदल तसेच आरक्षण व शेतीमाल यासह इतर अनेक गोष्टींमध्ये नकारात्मक असे नरेटीव सेट केल्या गेल्यामुळे महायुतीला याचा फटका बसला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,पारनेरचे राजकारणात आता बदल झाला असून कोरोना काळामध्ये निलेश लंके यांना सर्व प्रकारची मदत केली होती. परंतु त्यानंतर निलेश लंके बदलले व चांडाळ चौकडीने लंके यांचे नुकसान केले.
पतसंस्थांमध्ये जनतेचे पैसे आहेत व ते कोणीही बुडवू शकत नाहीत व असे कोणी केले तर कोणी किती जरी मोठा असला तरी मी त्याला सोडणार नाही असे देखील वक्तव्य त्यांनी केले. तसेच सुपा एमआयडीसी मधील अनेक उद्योजकांना व कारखानदारांना त्रास दिला जात आहे.
जर या विधानसभेला चूक केली तर मात्र पारनेर करांनो पाच वर्षे जबरदस्त किंमत मोजावी लागते असा टोला देखील अजित पवार यांनी या निमित्ताने लगावला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले की या विधानसभा निवडणुकीत एकी टिकवली तरच आमदारकी येईल.
नाहीतर आमदारकी आणि खासदारकी एकाच घरात जाईल. घोषणा देण्या इतकी ही गोष्ट सोपी नाही. एकजूट आणि एकी दाखवली नाही तर दुसऱ्याचे फावेल असा टोला अजित पवार यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.
औटी, सुजित झावरे आणि दाते समर्थकांमध्ये बॅनरवॉर आणि घोषणाबाजी
पारनेर विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून काशिनाथ दाते तसेच सुजित झावरे, माजी नगराध्यक्ष विजय औटी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत.
पारनेरच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी जेव्हा अजित पवार पानोली हिंदू चौकात येण्याच्या अगोदरच माजी नगराध्यक्ष औटी, सुजित झावरे आणि काशिनाथ दाते समर्थकांमध्ये घोषणाबाजी आणि बॅनरवॉर रंगल्याचे चित्र दिसून आले.
या माध्यमातून या समर्थकांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यामुळे उपस्थितांमध्ये पिकला हशा
अजित पवार या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना पारनेरच्या पठारी भागाला पाणी मिळावे असा बोर्ड हातात घेऊन शेतकरी नेते संतोष वाडेकर तसेच वसंत शिंदे व इतरांनी अजित पवार यांचे भाषण सुरू असताना
लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की पाणी कुठे आमच्या बापाचे आहे? तुला काय लंकेनी पाठवले काय? असा सवाल केल्यानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.