२१ जानेवारी २०२५ सूपा : यंदा शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्यात आली आहे.रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून ज्वारीचे नाव घेतले जात असे.मात्र ज्वारीची कमी उत्पादकता व मजुरांची कमतरता,यामुळे गव्हासारख्या तुलनेने उत्पादनास सोप्या व कमी मजुरांवर येणाऱ्या पिकाकडे शेतकरी वळाले.धान्याच्या माध्यमातून कष्ट वाया जाऊ न देणारे मक्याचे पीक दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न सोडवत असल्याने दूध उत्पादनाचा जोडधंदा करणारे शेतकरी मक्याचे पीक घेऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांनी फायद्यासाठी फळबागांच्या लागवडीखाली जास्त क्षेत्र आणले.त्यामुळे फळ पिकांनी ज्वारीच्या क्षेत्रावर अतिक्रमण केल्याने ज्वारीच्या क्षेत्रात उत्तरोत्तर घट होऊ लागली आहे.एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा परिसर उसाचे आगार म्हणून प्रसिद्ध होत आहे.मात्र, उसाला मिळणारा कमी दर पाहून शेतकरी आता फळ पिकांकडे वळले आहेत.
नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत झालेल्या पावसामुळे रब्बीतील ज्वारीची पेर लांबणीवर पडल्याने ज्वारीऐवजी बळीराजा अन्य पिकांकडे वळला.परिणामी यंदा ज्वारी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बाजारात अन्न धान्याच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे यावर्षी गरिबांची भाकरी महागणार असे दिसते.
पौष्टीक अन्न म्हणून ज्वारीला मागणी वाढत आहे.सध्या ज्वारीला ३ ते ५ हजार ६०० रुपये दर मिळत आहे.पेरणीला होणारा उशीर व घटणार क्षेत्र, यामुळे सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत.यंदा उत्पादन घटले तर ज्वारीच्या दरातील वाढ कायम राहील,असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.ज्वारीचे उत्पन्न कमी झाले तर ज्वारीबरोबर कडब्याचे दरसुध्दा वाढणार आहेत,त्यामुळे जनावरांचा चारा महाग झाल्यावर, दूध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहेत.
ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य असून भारतीय स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळख असणाऱ्या ज्वारीची शेतकरी दरवर्षी हमखास पेरणी करतात ; परंतु अलिकडे ज्वारीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कल आता फळपिके व नगदी पिके घेण्याकडे वाढल्यामुळे ज्वारीचा पेरा घटला असून हुरडयावरही संक्रांत आली आहे, त्यामुळे गरिबांची भाकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या बाजारभावात निश्चितच वाढ होणार आहे.