Parner News : अवकाळी पाऊस व गारपिकटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, केवळ पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई द्यावी, अशी मागणी आ. लंके यांनी या वेळी केली.
तालुक्यातील पारनेर, पानोली, वडुले, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगाव, म्हसणे, सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा,
या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपीटीमुळे शेतामधील पिके भुईसपाट झाली असून, फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबे उघडयावर आली आहेत. विजेचे खांब पडल्याने अनेक गावे अंधारात आहेत.
लंके यांनी सोमवारी सकाळी सात वा.पानोलीच्या पवळदऱ्यातील किसन पवार यांच्या कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. माझ्या आयुष्यात अशी अपत्ती मी पाहिली नाही, अशा भावना पवार यांनी या वेळी व्यक्त केल्या.
सोलर प्लॅन्ट, सिमेंट पत्रे यांच्यासह वाहनांच्या काचाही गारपिटीमुळे फुटल्याचे या वेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. शेतामध्ये काम करणारे शेतकरी व मजुरांच्या डोक्यावर, पाठीवर, तोंडावर गारपिटीमुळे जखमा झाल्याचेही
या वेळी आ. लंके यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आ. लंके यांनी पानोलीसह वडुले, सांगवी सुर्या, गांजीभोयरे येथील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
या वेळी पत्रकारांशी बोलताना आ. लंके यांनी सांगितले की, रविवारी दुपारी चार वाजल्यापासून तालुक्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट सुरू झाली. अर्धा एक तासाच्या कालावधीत होत्याचे नव्हते झाले,
टोमॅटो, कांदा, ज्वारी, जनावरांच्या चाऱ्यासह फळबागांचे शंभर टक्के नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करताना ८५ वर्षाच्या आजीबाई भेटल्या. माझ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पाऊस कमी झाल्याने आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करून दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडले.
थोडया फार पावसावर शेतकऱ्यानी घेतलेली पिकेही गारपीटीने उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात आहे. रविवारी रात्रीच आपण जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरसकट पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे आ. लक म्हणाले.