२१ जानेवारी २०२५ करंजी : विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून शिक्षण विभागाकडून २१ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार असून, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देखील दिली जाणार आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.कॉपी करण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रातील प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत शाळा विद्यालयास सूचना केल्या होत्या.
त्यानंतर परीक्षेपूर्वी प्रत्येक वर्गात शाळा व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, परीक्षा सुरू झाल्यानंतर या संपूर्ण परीक्षेचे चित्रीकरण बोर्डाला दिले जाणार आहे.त्यामुळे ज्या केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी केली जात असल्याचे प्रकार घडतात,त्या ठिकाणी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे निश्चितपणे कॉपी करण्याच्या प्रकारास आळा बसेल.
दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कॉपीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे तर हुशार विद्यार्थी मात्र या कॅमेऱ्यांबाबत समाधान व्यक्त करत आहेत.
दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा लवकरच सुरू होणार असून, परीक्षेच्या दरम्यान प्रत्येक ब्लॉकमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून,परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून,परीक्षा काळात चित्रीकरणाला काही अडथळा येऊ नये म्हणून जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला पाहिजे असे प्राचार्य संजय म्हस्के(तिसगाव) यांनी सांगितले.