Ahmednagar News : दुधाला शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर मिळावा, पशुखाद्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात, शासनाने जनावरांसाठी चाराडेपो व पेंड उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक गावात पशुवैद्यकीय सुविधा केंद्र सुरू करावेत,
पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा, आदी प्रमुख मागण्यांसह शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर न देणाऱ्या शासकीय सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी सकल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास संबंधीत मंत्र्यांना १ डिसेंबर रोजी पाथर्डी येथील नाईक चौकात दुग्धाभिषेक घालून ‘दूध एल्गार’ आंदोलन करू, असा इशारा आदिनाथ देवढे यांनी दिला आहे.
पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांवर ३.५ फॅट व ८.५ एस एन एफ याकरिता ३४ रुपये दर दिला जाईल, असे जाहीर केलेहोते. तसा निर्णय होऊनही शासकीय दुधसंघ आणि खाजगी दुध संस्था अतिशय कमी दराने २५-२६ रुपये प्रति लिटर प्रमाणे दुधास भाव देत आहेत.
दुसरीकडे चारा आणि पशुखाद्याचे दर कडाडले असून, शेतकऱ्यांचा दुध व्यवसाय कोलमडण्याच्या अवस्थेत आहे. दुध दरवाढीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नगर जिल्ह्यात दुध भेसळ अधिक असल्याचे कारण दिले जाते; परंतु त्यावर नियंत्रण ठेवणारे सरकारातील अन्न व औषध प्रशासन काय करत आहे ?
सरकारी व खाजगी दुध संघ कुणाच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या शेतकरी दुध उत्पादकांची लूट करत आहेत, असा प्रश्न यामधून निर्माण होत आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार इंगळे व तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.
आदिनाथ देवढे, आनंद सानप व ज्ञानेश्वर खवले यांनी माध्यमांसमोर सरकारच्या दुधप्रश्नांबाबत असलेल्या धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.या वेळी अक्षय वायकर, शहादेव भाबड, दत्तात्रय बडे, तुकाराम देवढे, महेश दौंड, प्रेमचंद खंडागळे, भिम गर्जे, महादेव मरकड, डॉ. सुहास सोनवणे, गणेश देवढे यांच्यासह अनेक दुध उत्पादक व शेतकरी उपस्थित होते.