अहमदनगर दक्षिण

अहमदनगर जिल्हा परिषदेतील ‘त्या’ अभियंत्यास शिक्षा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे यास विनयभंग आणि धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी ठोठावली आहे.

काकडे सध्या पाथर्डी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. काकडे हे जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध नगर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल होता.

या खटल्यातील वादीच्या महिला वकिल या न्यायालयात 10 जून 2010 रोजी जात होत्या. या महिला वकिलास अभियंता काकडे यांनी धमकावले होते. त्यांचा विनयभंग केला होता.

या महिला वकिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून काकडे याच्याविरुद्ध विनयभंग, धमकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काकडे यांनी ही संबंधित महिला वकिलाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी विनयभंग आणि धमकावल्याच्या गुन्ह्याचा तपास केला करून

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातून संबंधित महिला वकिलाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विनयभंगाच्या खटल्यात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.

आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडापैकी पाच हजार रुपये फिर्यादीला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. अ‍ॅड. केदार केसकर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office