राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील चार आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७५/२०२४ नुसार दाखल आहे.
या प्रकरणाचा खटला सध्या सुरू आहे. यातील आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडीक, बबन सुनील मोरे यांना सरकारी वकील उज्वल निकम यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याबाहेर वर्ग करण्याची राहुरी पोलीस व जेल अधीक्षक राहुरी यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यास परवानगी दिली.
त्यानुसार नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने चारही आरोपींना राहुरी पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे वर्ग केले आहे. आरोपी क्रमांक पाच हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने न्यायालयाने त्यास राहुरी सब जेल येथेच ठेवण्याचे आदेशित केले आहे.
ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलूबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब महंडुळे, पोलीस नाईक संभाजी बडे, उत्तरेश्वर मोराळे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते, इफतेखार सय्यद, प्रतीक आहेर यांनी पार पाडली आहे.