पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मुळा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात आले; मात्र ज्यांना घाई होती त्यांनी आधीच जलपूजन केले. मागील विधानसभा निवडणुकीत भावनिक होऊन पदरात मतं टाकले गेले; पण जनतेच्या पदरात काहीच पडले नाही, अशी टीका जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे मुळा नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन शिवाजीराव कर्डिले तसेच रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्डिले बोलत होते.
ते म्हणाले की, यापूर्वीदेखील दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सातत्याने नदीकाठावरील सर्व बंधारे भरून देण्याचे काम आपण केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. मानोरी बंधाऱ्यालगतच्या पुलासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार आहे.
केंदळ बुद्रूक येथील पुलाचा प्रश्न भाजपाच्या माध्यमातून सुटणार आहे. मुळा धरणातून जायकवाडीला पाणी जात असताना अधिकाऱ्यांना सांगून मुळा नदीवरील बंधारे भरून घेतले.
त्यामुळे सवांधिक लाभ मुळा नदीकाठच्या शेतकर्यांना सर्वाधिक झाला आहे. आम्ही जलपूजन करणार हे काहींना माहित असल्याने त्यांनी घाईघाईने जलपूजन उरकून घेतले. त्यांना जलपूजन करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.